Friday, 26 September 2014

कोणाच्या_खांद्यावर_कोणाचे_ओझे_2014. sarang s desai.


कविता उलगडून बघायचा सारंगचा प्रयत्न   

“....पडलो ह्या(ही) कवितेच्या प्रेमात, अन सुरवात झाली एका अनियंत्रित वैचारिक प्रवासाला. गंतव्य माहीत नाही पण रस्ता तर अगदी ओळखीचा भासत होता. प्रवासातील त्या क्षणांची आठवण रहावी म्हणून पुढची काही पाने खर्ची पडत आहेत. त्यात आत्मप्रौढीची छटा डोकावू लागल्यास बेलाशक शिव्यांची लाखोली वाहावी. माझी खोली मी अधिक प्रगल्भपणे जोखेन त्या निमित्ताने....”  

 “सामना” या चित्रपटातील आरती प्रभू, भास्कर चंदावरकर आणि रवींद्र साठे यांच्या या कवितेशी प्रत्यक्षपणे भेट घेता आली तर मात्र तो क्षण अवश्य अनुभवावा असे माझे सांगणे आहे... हे मान्य होईल अशी आशा बाळगतो. __ सारंग देसाई.    
     

कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे...

[ आरती प्रभू , भास्कर चंदावरकर , रवींद्र साठे ; सामना , निळू फुले , श्रीराम लागू ]

कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे
कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कोणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे ||१||


दीप सारे जाती येथ विरून विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून झडून
जीवनाशी घेती पैजा खोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे ||२||
अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
देई कोण हाळी त्याचा बळी पडे आधी
हारापरी हौतात्म्य हे ज्याच्याघारी साजे ||३|| ( हे नेहमी न ऐकले जाणारे कडवे )


       आरती प्रभूंची ही कविता कायमच हृदयाच्या जवळची वाटत आली आहे. पहिल्यांदा ऐकली होती मी ही कविता, तेव्हा होतो साधारणपणे ४ किंवा ५ व्या इयत्तेत. तेव्हा त्या कवितेतील आर्तता माझ्या मनाला जाणवत होती पण शब्दातून व्यक्त करणे जमत नव्हते. वयाच्या चढत्या क्रमानुसार ह्या कवितेतील गाभिथार्त ; “between the lines” उमजायला लागले. तेव्हा ह्या कवितेप्रती असलेले fascination शांत झाले. ह्या कवितेच्या जवळ जाण्याचा हा वैचारिक प्रयत्न करायला सुरवात केली.

 अत्यंत तरल भावनिक स्तरावर, दु:खातून उगवलेले हे चिंतन (?) बुद्धीच्या कसोटीवर तासून मगच लिहावे असे ठरवले. ते अधिकाधिक लख्ख असावे, कोणत्याही पूर्वग्रहाने दूषित नसावे असा प्रयत्न सतत करत आहेच.
 या स्वरूपात व्यक्त झालो नसतो तर अर्धवटपणे जगण्याच्या शिक्षेत अनंत काळासाठी चालणार्या चक्रात भरडत कधी संपून गेलो असतो त्याचे भानही राहिले नसते.

        जेव्हा कवी खांद्यावरील ओझ्याचा उल्लेख करतो तेव्हा हे समजते कि हे ओझे दुसर्या कोणाचे तरी आहे. त्याला ओझे वाहणाऱ्याची अगतिकता व्यक्त करायची असते. अशी काय बरे परीस्थिती असेल की ज्यामुळे ओझे वाहणार्याला स्वत:ची वेदना सांगता येत नाहीये ? कि त्याला ते ओझे आहे हेच समजत नसेल, त्याला ते हवे हवेसे वाटत आहे का ?

      ह्या रूपकाचा जगण्याशी फार जवळचा संबंध वाटतो. दैनंदिन जगण्यात अश्या अनेक ओझ्यांचा मी नकळत स्वीकार केला आहे. आणि आता मी काही त्यातून बाहेर पडू शकत नाही हे मला पुरते माहीत आहे. जर मी ते ओझे अव्हेरले तर तो तर माझा पळपुटेपणा ठरेल. ते मला नको आहे म्हणून मी अनेकदा हेच मान्य करत नाही की ते ओझे आहे. पण स्वतःला तरी किती दिवस वेड्यात काढायचे ? त्याला अंत आहेच ना. ह्या पहिल्या ओळीतूंनच कवीने माझ्या मनाचा ठाव घेतला.

      पुढच्या २ ओळीतून कवी प्रश्नार्थक विधान करत आहे. कवीला त्या ओझ्याचे कारण न सांगता समजले आहे असे वाटते. म्हणूनच कवी विचारात आहे की तंबू ठोकून त्या जागी का बरे थांबायचा निर्णय घेतला, का बरे स्वत:ची उर्जा एकाच ठिकाणी स्थिरावून कुंठीत केली ? खरे पाहता त्या ठिकाणी इतका जीव लावायची आवश्यकताच काय ? येथे कोणीही रक्त ओकून दुसर्या कोणा व्यक्तीसाठी थोडीच मरणाला कवटाळत आहेत ? कोणालाही स्वार्थ चुकलेला नाहीये. कोणीही स्वत:ची जागा त्या त्या ठिकाणी अनंत कालावधीसाठी गृहीत धरायची म्हणजे एक प्रकारे विसंगतीच. जगाचा नियम आहे कि, ते “परिवर्तनशील” आहे. ह्याचे भान का बरे सुटले ? अश्या प्रश्नार्थक विधानांच्या नंतर कवी फारच विरूद्ध भासणारा आशय मांडतो. तो सांगतो कि ह्या ठिकाणी अनेक माणसे अशी आहेत कि जी अंतर्मनात कुजून  जातात आणि आयुष्य जगतात. त्यांच्या असण्याने खरे बघता दु:ख अधिक गहिरे होते. त्या दुखा:ला बधीरतेचा अंश प्राप्त होतो. आणि दुर्दैवाची परिसीमा अशी कि ह्या इतक्या वाईटात गुलाबांच्या बहराचे दर्शन होते. म्हणजेच सार्या वाईट गोष्टींच्या पार्श्वभूमीवर काहीसे भलेपणाचे क्षणिक का होईना दर्शन होत आहे. म्हणूनच कवी गुलाब हे सगळ्या चांगल्या गोष्टींसाठीचे रूपक वापरात आहे. लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे कि, गुलाबांचे दिसणे हा खरे तर विरोधाभास आहे. पण ओझ्याची इतकी सवय झाली आहे कि गुलाब फुलवण्याचा सोस काही केल्या कमी होईल असे दिसत नाही. मात्र कवी ह्यात गुंडाळला जात नाहीये तो ह्या बाबत प्रश्नार्थक विधान करत आहेच, त्याला हे उमजत नाहीये कि गुलाब ह्या इतक्या नैराश्यवादी वातावरणात कसे बरे फुलतात ?

            पुढील २ ओळीमध्ये कवीने ह्याच परिस्थितीचे अधिक बारकाईने चित्रण केले आहे. दीप आणि वृक्ष ह्या दोन रूपकांचा वापर मुद्दामून २ विरुद्ध प्रकारची प्रतीके वापरली आहेत. दीप हे रूपक  वापरून कवी अत्यन्त्य अल्प स्वरूपातील जो काही होता तोही आशावाद ह्या परीस्थीतीत नष्ट झाला आहे असे सांगू इच्छितो. दीप हे सर्जनाचे, मांगल्याचे, श्रद्धेचे आणि विश्वातील सर्व प्रकारच्या पवित्रतम गोष्टींचे प्रतिक आहे. पण आता ह्या सार्या गोष्टीसुद्धा अस्तित्वात नसल्याचा विषाद सर्वत्र पसरला आहे. हे दीप मात्र विझले नाहीयेत तर ते विरूनही गेले आहेत. विझणे ही क्षणिक अवस्था असते, दीप पुन्हा प्रज्वलीत करता येतो पण विरणे ही चिरकाल पर्यंत टिकणारी स्थिती आहे विरून गेलेला दीप पुन्हा प्रज्वलीत होणार कसा? हे सत्य मनावर औदासीन्याचे मळभ आणण्यासाठी पुरेसे आहे. दु:ख याचे आहे कि ते सत्य आहे. तो निराशावाद नाही. निराशावादावर आशावादाचा तोडगा निघू शकेल मात्र सत्य नाकारून पुढे जायचे कसे हा नेमका प्रश्न अनुत्तरीतच आहे. यानंतर कवी वृक्षाचे रूपक वापरून परिस्थितीचे गांभीर्य दर्शवून देतो. तो म्हणतो कि, वृक्ष अंधारात गोठून आणि झाडून जात आहेत. खरे तर वृक्ष हे वर्षानुवर्षे भल्या बुर्या संकटांना तोंड देत खंबीरपणे उभे असतात. पण आता तर हे वृक्षसुद्धा बर्या अवस्थेत नाहीत. ते या नैराश्यरूपी अंधारात निपचित झाले आहेत. ते गोठले आहेत, झडले आहेत. वृक्षांनी गोठणे, झडणे म्हणजे त्यांचा जीवनधर्म सोडणे. स्वत:चा जीवनधर्म सोडवा लागतो अशी विदारक स्थिती येणे ही निराशावादाची कमाल मर्यादा असणार. बरे आता इतके थोडे कि काय म्हणून अश्या जगण्याशी पैजा घेण्याची सहज मानवी वृत्ती कशी बरे नाहीशी होणार ? त्यांतही एक अटटाहास आहेच. यावर कडी म्हणून कि काय, हे आंधळेपणाने जगण्याशी पैजा घेणारे लोक म्हणजेच वेडे पीर स्व:च स्व:तला श्रेष्ठत्व बहाल करतात. असे होते कारण एकूणच जग इतके व्यंगात्मक पद्धतीने वागत असते कि, कोणी एक जण दुसर्या व्यक्तीचे मोठेपण मान्य करायला तयारच नसते. कारण तसे केले तर स्वत:ला अंमळ उशीरा मिळणारे उदोउदो केले जाण्याचे खोटे समाधान विरून जाणार असते. आणि मग अश्या झोल असलेल्या समाजात स्वत:साठीच मोठेपण ओरबाडून घेण्याची नामुष्की येणारच ना ! हे फारच व्यंगात्मक विनोदी जगणे कवी फार तरल शब्दातून मांडत आहे. (ते मी योग्य लाईटमध्ये समजून घेत आहे का ते जोखले जाणे जास्त महत्वाचे. हे शब्दजंजाळाचे ओझे पेलण्यासाठी खमका खांदा मिळायला हवा !)

            कवितेच्या तिसऱ्या, शेवटच्या कडव्यात जो गहिरा आशय कवीने चित्रित केला आहे त्याचा अर्थ लावताना खरोखर मानवी प्रतिभेच्या या काव्यात्म आविष्काराप्रती माझी मती लीन होते.        
      तर या कडव्याच्या पहिल्या रूपकामध्ये, कवी म्हणतो की, अस्ताआधी अंत झाला आहे. अंत म्हणजे शेवट. पण त्यातही “पुनरुज्जीवीत न होण्याची अवस्था” असा आशय दडलेला आहे. अस्त मात्र पुनर्निमाणाची; अंकुरीत होण्याची वाट पहात घडलेली एक अटळ घटना असते. [ म्हणूनच मराठीत अनंत आणि सूर्यास्त असे शब्द रूढ झालेले असणार. अनंत म्हणजे ज्याला कधीही शेवट नसलेले, चिरकाल टिकणारे. सूर्यास्ताच्या नंतर सूर्योदय होणार असा दिलासा असतोच. उदयास्त असापण शब्द आहेच. ] म्हणूनच अस्त-अंत हे वैश्विक सत्य असले तरी अंत (चिरकालासाठी निद्रिस्त) होणे हे अस्त होण्यापेक्षा अधिक निराशावादी मानले पाहिजे. कारण अंतानंतर पुढे काय ह्याचे उत्तरच नाहीये. पुढच्या रूपकामध्ये कवी जन्म आणि व्याधी यांचे असलेले व्यस्त नाते मांडत आहे. जगण्याचा शेवट हा एखाद्या दुर्धर आजारामुळे होत असेल तर व्याधीग्रस्त असे विशेषण चिटकवले जाते. पण येथे मात्र कवी जन्मालाच व्याधी म्हणत आहे. याचा अर्थ सुरवातच “शेवटाची मिटवता येणार नाही” अशी खूण घेवून झाली आहे. या निरीक्षणानंतर कवी सांगत आहे कि, अशी अवघड स्थिती असली तरी या दुखा:चे भांडवल करणे काही शहाणपाणाचे लक्षण नाही कारण कवी या दुःखाच्या गाण्यांना पोकळ समाधी म्हणत आहे. अशी समाधी कि जेथे स्थितीप्रज्ञ अवस्थाच नाही. केवळ दिखाऊ मोठेपण ! काय साध्य आहे या समाधीचे ? हि समाधी म्हणजे निरर्थाकाची फौज बाळगण्यासाठी केलेली हिशोबी गुंतवणूक असते. पुढे कविचे सांगणे असे आहे कि, अश्या नैराश्यवादी परिस्थितीत जर कोणी बंडखोरीच्या उद्देशाने आरडाओरडी करण्याचा प्रयत्न केला तर हा जो कोणी so called बंडखोर असेल त्याचा नि:पात झाल्याशियाय राहणार नाही. प्रथम ह्या व्यक्तीचा बळी पडेल आणि मगच पुढचे प्रश्न निकालात निघतील. गंमत म्हणजे असे चित्र आजच्या समाजात बघणे फार काही अवघड राहिले नाहीये. ही कविता इतकी कालातीत आहे हे उमगल्यावर मनात विषाद उगम पावतो. पण यावर काहीही समाधानकारक पर्याय उपलब्ध नाहीये हे सत्य स्वीकारावेच लागते. शेवटच्या ओळीतून ह्या बंडखोर शूरवीराच्या दुर्दैवी जगण्याची बखर मांडताना एकदम शेलके विधान करतो. तो म्हणतो कि ह्या जीवाच्या आकांताने सावधानतेचा हकारा देणाऱ्याच्या घरी काही फुले, हारतुरे यांचा वर्षाव नाही होत तर लागते हौतात्म्याचे लेबल. असे लेबल कि जे आयुष्य प्रामाणिकपणे, भलेपणाने जगल्याची सहीसही किंमत वसूल करूनच मिळाले आहे. जशी समाधी ही पोकळ होती अगदी तसेच हे हौतात्म्याचे लेबल वास्तवात काही काही कामाचे नसते. तोंडदेखली वाहवा, अनुकंपा आणि लोकलज्जेस्तव दाखवलेली सहवेदना ह्याच काय त्या लेबलची किंमत.


Sarang Sudhir Desai
31, Bharadwaj, Model Colony,
Near D-Mart, S V Road,
Water Tank, Jule Solapur, Solapur 413008
0217-2300020; 8055509180.

ssdindia@gmail.com


The whole document is typed in the “Devanagari”; which at times gets little uncomfortable to scribble the classical Marathi word. Please do let me know if you face difficulty while going through this document. I will try to sort it out to my level best.

            Thanking you for reading this narrative attentively.









No comments:

Post a Comment